आधी अंगावर गुलाल उधऴला, पेढे खाल्ले. मग, आता पुन्हा का येतेय उपोषणाची वेळ?

जरांगे पाटलांची उठ-बस नेमकी कुणाच्या मुळावर?

पुणे : टीम सत्ताकारण

Maratha Reservation | मराठा समाजाला कुणबी दाखले मिऴावेत, यासाठी मोठे आंदोलन केल्यानंतर सरकारने अध्यादेश नव्हे तर मसुदा काढला आहे. त्यास काहीजण अध्यादेश म्हणत आहेत. त्याची आजपासुनच अंमलबजावणी करावी, त्याचे लवकरात लवकर कायद्यात रूपांतर करा, अन्यथा येत्या १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मागील पाच महिन्यापासुन केलेल्या आंदोलनानंतर २६ जानेवारी रोजी जरांगे यांनी मुंबईच्या दिशेनी राज्यभरातील बांधवांना सोबत घेत मोर्चा नेला होता. मात्र, वाशी येथेच आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्या, असे सांगत त्या मसुद्याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जरांगे यांना देण्यात आली.

त्यांच्याहस्ते अंगावर गुलाल घेत पेढे खाल्ले. त्यानंतर हा मोर्चा माघारी फिरवला. मात्र, मागण्या खरचं मान्य झाल्यात की सरकारने मराठ्यांना फसवले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे लोकांना काय उत्तरे द्यायची, असा प्रश्न जरांगे यांच्यापुढे आहे.

यातुन त्यांनाही आपली फसगत होत आहे काय, असे वाटत असावे. त्यातुनच त्यांनी आता त्या मसुदा की अध्यादेशाची अंमलबजावणी सुरु करा, अन्यथा येत्या १० फेब्रुवारीपासुन पुन्हा उपोषण सुरु करु, असे जाहीर केले आहे.

एकीकडे आपल्याला आरक्षण मिळाले, असे जाहीर करत गुलाल उधळायचा, पेढे खायचे, मोर्चा माघारी घ्यायचा आणि सरकारने मराठ्यांना फसवलं, अशी लोकांमधुन टिका होताच पुन्हा उपोषण करण्याचा इशारा द्यायचा, अशी वेळ जरांगे यांच्यावर का येतेय,

असा प्रश्न निर्माण होतो आहे. जरांगे यांची उपोषणाची उठ आणि बस ही बाब नेमकी कुणाच्या मुळावर उठत आहे? भलं कोणाचे होणार? मराठ्यांचे आणि सरकारचे? आंदोलानाचा फायदा कुणाला होणार, सरकारला की केवळ मराठ्यांना?

असे प्रश्न उपस्थीत होत असल्याने सरकार मराठा समाजाला खेळवत आहे, अशी टिका सध्या समाज बांधव करीत आहेत. आंदोलनाच्या रेट्यामुळेच शासनाने मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांच्या नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याचा मसुदा काढला.

दरम्यान, मंगळवारी (ता.३०) जरांगे पाटील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहचले. रायगडावरून उतरल्यानंतर पाचाड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण सरकारने वेळोवेळी आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले आहे.

मात्र, मुदतवाढ देऊनही समिती काम करीत नाही. हैदराबाद गॅझेट स्वीकारलेले नाही. ते त्वरित स्वीकारावे. १८९४ ची जनगणना स्वीकारलेली नाही, ती स्वीकारण्यात यावी. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी.

मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे १० फेब्रुवारीच्या आत मागे घेतले जावेत. फेब्रुवारीतील विशेष अधिवेशनात अध्यादेश काढुन त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अशा मागण्या केल्या.

सगेसोयऱ्यांबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे. केंद्रात जाण्याची भाषा चुकीची आहे, असा आक्षेपही जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. सर्वसामान्य गरीब मराठ्यांसाठी आरक्षण गरजेचे आहे. पुढे काय होईल ते मला माहीत नाही,

पण मी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर सर्वत्र मराठा समाजाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे.

हे यश मिळताच जरांगे यांनी किल्ले रायगडावर शिवरायांचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी (ता.२९) उशिरा रात्री ते किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामासाठी दाखल झाले आणि मंगळवारी (ता.30) संपूर्णतः गड अनवाणी चढून ते दुपारी अडीच वाजता छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले.

यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळांवरून त्यांना छेडले, असता त्यांनी भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनादेखील ते धोकादायक ठरणार असल्याचे म्हटले.

सगेसोयरे या शब्दावरून त्यांनी, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत, त्यांच्यासाठी ‘सगेसोयरे’ मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे एकही मराठा समाज बांधव हा आरक्षणापासून वंचित राहणार नसल्याचे म्हटले.

You might also like