बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ ला जागतिक स्पर्धेत पहिला पुरस्कार 

जगातील ८८०० छायाचित्रात बैजू यांना पहिला पुरस्कार 

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

Baiju Patil | देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’ या बर्ड कॅटेगरीतील ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्ष्याच्या छायाचित्राला जगातील पहिले पारितोषिक मिळाले. जागतिक स्तरावरील ‘एफआयआयएन’ हा पुरस्कार मिळाला. जगभरातून आलेल्या ८८०० फोटोंमध्ये बैजू यांच्या फोटोला पहिला मान मिळाला. पोर्तुगाल गाला येथे नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला.

प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू हे मागील ३७ वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. वाइल्डलाइफ क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ असे क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. पुरस्कार प्राप्त पक्ष्याचा हा फोटो बैजू यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर येथे दुर्गम भागात जाऊन काढले आहे. वास्तविक पाहता बैजू  मागील चार वर्षांपासून हे क्षण टिपण्यासाठी सातत्याने या ठिकाणी जात होते. पण हवा तसा फोटो त्यांना मिळत नव्हता. परंतु, सलग तीन वर्ष अथक परिश्रम घेऊनही फोटो मिळाला नसला तरी त्यांनी आशा सोडली नाही. हा फोटो घेण्यासाठी बैजू यांना आधी पक्ष्याच्या वागण्याचा सखोल अभ्यास करावा लागला. कुठल्या वेळेला हे पक्षी येतात. आग लागल्यानंतरही किडे खाण्यासाठी त्यांची नेमकी धडपड कशी असते याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या भागात तळ ठोकून मनासारखा क्षण कॅमेऱ्यात टिपेपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी मागील वर्षी हा फोटो घेण्यात त्यांना यश मिळाले. पुरस्काराबद्दल बैजू यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ज्वाळांचा भडका अन् भक्ष्यावर लक्ष जगातील पहिल्या क्रमांकाचा हा फोटो बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात काढला आहे. या भागात जेव्हा शेतामध्ये ऊस तोडणी होते तेव्हा उरलेली पाचट शेतकऱ्यांकडून जाळण्यात येते. मोठ्या प्रमाणात पाचट जळते तेव्हा परिसरात प्रचंड धूर पसरतो. हा धूर पाहून ड्रोंगो या दिशेने उडून येतात. आग लावल्यामुळे पाचटावरील असंख्य किडे हवेत उडू लागतात. हे किडे ड्रोंगोचे भक्ष्य असल्याने तो किड्यांना पकडण्यासाठी ज्वाळांच्या मधून मार्ग काढत त्यांच्याकडे झेपावतो. दिवस उजाडतो तेव्हा किंवा मावळतीला बऱ्याचदा हे चित्र पाहायला मिळते. किडे पकडण्याची ही क्रिया पापणी झाकून उघडेपर्यंत पूर्ण होत असल्याने त्याचा फोटो मिळणे तसे फार अवघड असते. पण योग्य नियोजन आणि अथक परिश्रम अन् निराश न होता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास काहीच अशक्य नाही, हे बैजू पाटील यांनी दाखवून दिले आहे.

 

फोटो घेताना आगीच्या झळा सोसल्या, शूजचे सोलही जळाले

आगीच्या ज्वाळा भडकल्या असतानाही ड्रोंगो जेव्हा भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्याकडे झेप घेतो तो क्षण टिपणे सोपे नव्हते. यासाठी बैजू यांनी आधी अभ्यास तर केलाच पण स्वत: त्यांना आगींच्या झळा सोसाव्या लागल्या. बऱ्याच वेळा आगीच्या संपर्कात राहिल्याने त्याच्या झळा लागून कॅमेरा मध्येच गरम व्हायचा, ज्वाळांच्या शेजारी बराच वेळ राहिल्याने बऱ्याचदा चटकेही बसायचे. हा फोटो घेण्याच्या प्रयत्न करत असताना एकदा तर बैजू यांच्या बुटाचा सोल पूर्णपणे आगीत जळून गेला व पायाला चटके बसले.

You might also like