मराठा हुतात्मा काकासाहेब शिंदेंच्या पुतळ्याला तडे

विटंबना झाल्याची अफवा; बांधवांनी त्यावर विश्वास न ठेवण्याचे काकासाहेबांच्या बंधूचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : टीम  सत्ताकारण

मराठा आरक्षणासाठी ‘गोदावरी’च्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे Kakasaheb Shinde यांच्या गोदावरी नदीच्या फुलावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कुणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. गंगापूर) येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी इशारा देऊन २३ जुलै २०१८ ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास कायगाव पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेत प्राण दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रेमींनी कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब यांचा पुतळा बसविलेला आहे. त्यानंतर कायगाव पुलाचे नामकरण ‘हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू’ असे करण्यात आले आहे. दरम्यान, आज शनिवारी (ता.२५) काकासाहेबांच्या पुतळ्याला तडे गेल्याची माहिती समोर येताच कायगाव पुलावर मराठा समाज बांधवांनी गर्दी केली. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त लावला आहे. सध्या तरी, तणावपूर्ण शांतता आहे.

 

पुतळ्याची कोणतेही विटंबना झाली नसून मराठा समाज बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन काकासाहेब यांचे भाऊ अविनाश शिंदे यांनी केले आहे. आपण मराठा बांधवासोबत जाऊन पाहणी केली असता, असे लक्षात आले की,  काकासाहेब यांचा पुतळा गेल्या चार वर्षांपासून उन्हात, पाऊसात असल्याने त्यास तडे गेले असल्याचे निदर्शनास आले, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

You might also like