सरकार पुन्हा अंतरवालीत; जरांगे पाटलाच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष

आरक्षणावर तोडगा काढणार, की हात हालवत परतणार?

छत्रपती संभाजीनगर : राजेभाऊ मोगल

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाने सरकारची झोप उडाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बुधवारी (ता.१) सर्वपक्षीय बैठकीत उपोषण मागे घ्यावे, असा ठराव घेण्यात आला.  मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या सरकारने गुरुवारी (ता.२) जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ पाठवले असुन ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.  त्यांनी आरक्षणाबाबत काही ठोस आश्वासन दिले तरच जरांगे पाटील त्यांना प्रतिसाद देतील, नाही तर या शिष्टमंडळास हात हालवत परतावे लागेल, नेमके काय होतेय? हे काही वेळातच समोर येणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मागील काही महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी आर- पारची लढाई सुरू केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात या उपोषणाच्या ठिकाणी सरकारमधील अनेकांनी भेटी दिल्य. उपोषण मागे घ्यावे, यासाठीही मोठे प्रयत्न केले. मात्र, याच दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देण्यासाठी आम्हाला एका महिन्याचा अवधी द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी ४० दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, या ४० दिवसांत सरकारकडून काहीही हालचाली न झाल्याने जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाचा आज नववा दिवस असून या आंदोलनास राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, धैर्यशील सोळंके यांच्याघरांसह समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांची हॉटेल पेटुन देण्यात आली. या जाळपोळीच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने काल बुधवारी तातडीने सह्याद्रीवर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावत बैठक घेतली.

या बैठकीत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, सरकारला सहकार्य करावे, असा ठराव घेतला. मात्र, हा ठराव देखील जरांगे पाटील यांनी धुडकावून लावला. सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्यावे, तसे प्रमाणपत्र वाटप सुरू करावे, या मागणीवर आपण ठाम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली असून आता ही कोंडी सोडवायची कशी, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी एक शिष्ट मंडळ अंतरवाली सराटी येथे पाठवले आहे.

या शिष्टमंडळात आयोगाचे माजी न्यायमुर्ती एम. जी. गायकवाड, आनंद निगुर्डे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अतुल सावे,  मंत्री उदय सामंत,  आमदार बच्चू कडू, नारायण कुचे यांचा समावेश समावेश आहे. या शिष्टमंडळास जरांगे पाटील यांचे मन वळविण्यात किती यश येते, की पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागते? हे काही वेळातच समोर येणार आहे.

You might also like