आयएमएच्या समाजोपयोगी उपक्रमांचा देशपातळीवर डंका

'आओ गाव चले', 'स्पेशालिस्ट फ्री ओपीडी'सारखे उपक्रम घेतले हाती

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

केवळ डॉक्टरांच्या समस्यांसाठीच लढणारी इंडियन मेडिकल असोसिएशन ही संघटना आता थेट सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मूलभूत प्रश्नांना हात घालणारे अनेत उपक्रम घेऊन, शहरवासीयांचे आरोग्य कसे अबाधित राहील, याबाबत प्रयत्न करीत आहे. येथील शाखेच्या उपक्रमांची आता देशपातळीवर दखल घेण्यात येत आहे.

 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे स्थानिक अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे सध्या राबवत असलेल्या उपक्रमाबाबत माहीती देताना म्हणाले, समाजाने डॉक्टरांना मोठे केलेले आहे. त्यामुळे आम्हीदेखील समाजाचे देणे लागतो याच जाणीवेतुन आम्ही आओ गाव चले आणि स्पेशालिस्ट फ्री ओपीडी सारखे महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच पाच गावे आपण दत्तक घेत आहोत. त्यापैकी पांढरी पिंपळगाव, कौडगाव आणि धामोरी या तीन गावात प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. मागील पाच महिन्यात आम्ही आरोग्य विषयक वेगवेगळे कार्यक्रम या तिन्ही गावात घेतले आहेत हे सर्व कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहेत.

 

ज्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णांना शहरात जावे लागते,  दोन-दोन दिवस आधी नंबर लावावा लागतो, अशा डॉक्टरांची भेट आपल्या गावात होते आहे,  याचा आनंद प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हा रुग्णाने दिलेल्या फीस पेक्षा कधीही मोठा असतो. या शिबीरात केवळ रुग्ण तपासणी होते असे नाही, तर त्यांना पूर्ण उपचार औषधी गोळ्या देऊ केले जातात, ज्या तपासण्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये खर्च येतो अशा बोंन डेन्सिटी मशीन, पलमोनरी फंक्शन टेस्ट मशीन, ऑडिओ मेटरी, इसीजी आम्ही सोबत घेऊन जातो. या तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जातात. ऑटो रिफ्रॅक्टोमीटर सारख्या मशीन द्वारे रुग्णांचा चष्मा चा नंबर काढून नंबरचे चष्मे वितरित केले जात आहेत.

 

संघटनेचे सचिव डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, गावातील सर्व महिलांना गावातील मंदिरामध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये ठरवून दिलेल्या वेळेत येण्याचे आवाहन करतो. आणि त्यांची रक्त तपासणी करण्यात येते. आणि दोन दिवसानंतर, पूर्ण तपासणीचे अवलोकन करून, ज्या महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी आहे, अशा महिलांना पूर्ण उपचार योग्य तपासणीअंती एमडी मेडिसिन डॉक्टर सदस्यांद्वारे दिले जातात. समाजातील उपेक्षित घटकांमध्ये आजही मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी गैरसमज आणि उदासीनता दिसून येते. यासाठी असोसिएशनने यावर्षी विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. यासाठी पाच कार्यशाळा  आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. आयएमएतर्फे पाच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स नुकत्याच बसवण्यात आलेल्या आहेत. रक्तदाब मधुमेह आणि अस्थमा जनजागृती करण्यात येत आहे.

 

नामवंत आणि ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध व्हावी यासाठी आयएमए प्रयत्नशील होती. यावर्षी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.  स्पेशलिस्ट फ्री ओपीडी या अंतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मिनी हॉलमध्ये ही ओपीडी सुरू झाली. यामध्ये दररोज दुपारी चार ते सहाच्या दरम्यान शहरातील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक आपली मोफत सेवा देऊ करतात. अत्यंत यशस्वीपणे ही वाटचाल सुरू आहे. आयएमएचे शहरात १५०० पेक्षा जास्त स्पेशलिस्ट डॉक्टर्स सदस्य आहेत. वैद्यकीय हा केवळ व्यवसाय नसून रुग्णसेवेचे रूपाने चालून आलेली ईश्वरसेवीची संधीच आहे, अशा भावना ठेवुन  काम करणाऱ्या डॉक्टरांची ही संघटना असल्याचे डॉ. टाकळकर यांनी सांगीतले.

You might also like