आरक्षणाच्या रस्त्यात कुणी निर्माण केले कायदेशीर अडथळे?

जरांगे पाटील, आंदोलनाचा शेवट निराशेत व्हायला नको!

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण

प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ समाज घटक म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी आहोत. आरक्षणाच्या रस्त्यात कुणी-कुणी कायदेशीर अडथळे निर्माण केले, हे आता राज्यातील समाजबांधवांना कळाले आहे. जरांगे पाटील, आम्ही आपल्या सोबत आहोत. मात्र, आंदोलनाचा शेवट निराशेत व्हायला नको. अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, शिवप्रहार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केली.

याबाबत श्री. इंगळे यांनी लिहलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. ते म्हणतात, या आंदोलनाचा शेवट काय होईल? अथवा सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र सरकार देऊ शकेल का? अथवा सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करू शकेल का? ही सामान्य कार्यकर्ता म्हणून शंका आहे. गायकवाड आयोगाच्या शिफारशी सुप्रीम कोर्टात मांडताना जवळपास पाचशे पानाचा इंग्रजी अनुवाद करण्यात उपसमितीचे तत्कालीन अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व सरकार कमी पडले.

कोरोनाच्या काळात सुप्रीम कोर्टाची ऑनलाइन सुणावनी सुरू असताना तत्कालीन सरकार सपशेल कमी पडले. त्यावर कळस म्हणून मागासवर्गीय आयोग नेमताना लक्ष्मण हाके व बबनराव तायवाडे यांच्यासारखे मराठा द्वेष करणारे ओबीसीनेते सदस्य म्हणून नियुक्त केले. हे सर्व पाप अशोक चव्हाण यांचे आहे. सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा पेच किचकट केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी काही समन्वयकांच्या तोंडाला आर्थिक रसदचे रक्त लावून बाटवले. म्हणून अशा बाटग्या समन्वयकावर लोकांचा रोष असल्यामुळेच ग्रामीण भागातून तसेच शहराच्या विविध भागातून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मात्र, या आंदोलनाचा शेवट निराशात होऊ नये, अशी आशा करूया!. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणाप्रती प्रचंड प्रामाणिक आहेत, असे सद्यस्थितीत दिसून येत आहे. परंतु त्यांना अनेक किचकट कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. हेही तेवढेच खरे. क्युरेटीव्ह पिटीशन परत दाखल करून खेळत ठेवून त्यावर परत लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका काढण्याचा कट भाजपनी रचू नये, अशी अपेक्षा.

टिकणारे व कायदेशीर आरक्षण याचा मार्ग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल यातूनच जातो हेही तेवढेच खरे. परंतु नऊ पैकी आठ मागासवर्गीय आयोगाचे सदस्य मराठा विरोधक व पूर्वग्रह दूषित असल्यामुळे तेथेही आडकाठी निर्माण झाली आहे, हे वास्तव असल्याचेही श्री. इंगळे यांनी म्हटले आहे.

You might also like