आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- जरांगे पाटील संतापले

४० दिवसात तुम्ही काय केले? असा सवाल करीत आंदोलन थांबविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरु असल्याचा केला आरोप

छत्रपती संभाजीनगर : याेगेश कदम 

Maratha Reservation | तुम्ही तीस दिवस मागितले होते, मी ४० दिवस दिले. या ४० दिवसात तुम्ही काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा पवित्रा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतला आहे.

अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी ४० दिवसानंतर पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली असून आज मंगळवारी आंदोलनाचा आठवा दिवस आहे. सरकारने ४० दिवस मागून घेतल्यानंतर कुठलीही सकारात्मक घोषणा केली नाही. या ४० दिवसाच्या काळात जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे केले. त्यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू झाला. या काळात सरकारकडून फारसे प्रयत्न न झाल्याने, शिवाय केवळ ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करू, अशी भूमिका सरकारने घेतल्यामुळे जरांगे पाटील संतापले आहेत.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. मला केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर राज्यभरातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण हवे आहे. हे आंदोलन आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. आंदोलन उधळण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. या आंदोलनादरम्यान पोलीस यंत्रणा सरकारसोबत आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना देखील हे सरकार पोलिसांना सांगून मारहाण करीत आहे. यामागे उपमुख्यमंत्र्याचा डाव आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

आंदोलन थांबविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. आंदोलन बंद करण्याची भूमिका सरकारने घेतली असून ती समाजाला मान्य नाही. सरसकट आरक्षण द्या; अन्यथा आज संध्याकाळपासून आपण जलत्याग करणार आहोत. असे असे सांगत हे आंदोलन आता थांबणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

You might also like