Marathwada

सामाजिक बांधिलकी जपत सतीश चव्हाण यांचे विविध उपक्रम; विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत मदतीचा हात

नोकरी महोत्सव, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन, गरजू रुग्णांना आरोग्यसेवा आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत; विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : टीम सत्ताकारण
मराठवाड्यातील विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि गरजू नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम करत सतीश चव्हाण यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविल्याचा त्यांच्या कार्यअहवालात उल्लेख आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापासून ते आरोग्यसेवा, शेतकऱ्यांना मदत आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत विविध क्षेत्रांत त्यांनी पुढाकार घेतल्याचे या अहवालातून समोर येते.
रोजगार आणि शिक्षणासाठी उपक्रम
मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, या उद्देशाने २०२१ आणि २०२४ मध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतरच्या शिक्षणाच्या संधी आणि करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘वैध भविष्याचा’ या करिअर मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजनही करण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकलेला वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आयोजित करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना विधानसभेचे कामकाज आणि संसदीय कार्यपद्धती समजावी, या उद्देशाने विधान भवन भेटीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात
वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राहण्याची, भोजनाची तसेच परीक्षा केंद्रापर्यंत जाण्या-येण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली. कोविड काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि गरजू नागरिकांसाठी जवळपास दोन महिने भोजनाची व्यवस्था करण्यात आली. याच काळात दहा हजार कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आल्याचाही अहवालात उल्लेख आहे.
गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवा
भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठवाड्यातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना विविध योजनांद्वारे तसेच दानशूर संस्थांच्या सहकार्याने मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून अनेक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. कोविड काळात मराठवाड्यातील विविध शासकीय रुग्णालयांना स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत
कोविड काळात आर्थिक संकटात सापडलेल्या चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बायर क्रॉप सायन्स लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी जमा करून तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केल्याचा अहवालात उल्लेख आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करून शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, उद्योजक, वकील आणि साहित्यिकांना मराठवाड्याच्या विकासाविषयी विचार मांडण्याची संधी देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १४ सप्टेंबर २०१५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांसोबत जेलभरो आंदोलन करण्यात आले. याशिवाय गंगापूर येथे २०२३ मध्ये ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या आयोजनातही सहभाग नोंदविण्यात आला.
रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतील या उपक्रमांच्या माध्यमातून मराठवाड्यातील विविध घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा प्रयत्न झाल्याचे सतीश चव्हाण यांच्या कार्यअहवालातून दिसून येते.

Related Articles